शेतकऱ्यांची सरसकट संपूर्ण कर्जमाफी करा – नुमान चाऊस
चालू अधिवेशनात तात्काळ घोषणा करा; अजितदादा पवार यांचे स्वप्न पूर्ण करा
बीड | प्रतिनिधी
राज्यातील शेतकरी सध्या गंभीर आर्थिक संकटात सापडलेला असून वाढती महागाई, नापिकी, नैसर्गिक आपत्ती आणि कर्जाचा वाढता बोजा यामुळे शेतकऱ्यांचे जीवन अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने चालू अधिवेशनातच शेतकऱ्यांच्या सरसकट संपूर्ण कर्जमाफीची तात्काळ घोषणा करावी आणि दिवंगत नेते अजित दादा पवार यांचे शेतकरीहिताचे स्वप्न पूर्ण करावे, अशी ठाम मागणी मौलाना आझाद युवा मंचचे बीड जिल्हाध्यक्ष नुमान अली चाऊस यांनी केली आहे.
नुमान चाऊस म्हणाले की, अजितदादा पवार यांनी नेहमीच शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले. शेतकऱ्यांना दिलासा देणारे धाडसी आणि निर्णयक्षम नेतृत्व ही त्यांची ओळख होती. आज शेतकरी हतबल अवस्थेत असताना, त्यांच्या विचारांना आणि कार्याला खरी श्रद्धांजली द्यायची असेल तर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी जाहीर करणे हाच योग्य मार्ग आहे.
ते पुढे म्हणाले की, कर्जबाजारीपणामुळे शेतकरी तीव्र मानसिक तणावाखाली असून आत्महत्यांचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढत आहे. ही स्थिती रोखण्यासाठी केवळ आश्वासनांवर न थांबता ठोस व तातडीचे निर्णय घेणे आवश्यक आहे. चालू अधिवेशनात कर्जमाफीची घोषणा झाल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल आणि सरकारबद्दलचा विश्वास अधिक दृढ होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.


