*पत्रकार – पत्रकार*
सच्च्या व प्रामाणिक पत्रकारांना विचारतंय कोण? ईद असो वा दीपावली त्यांच्यासाठी प्रत्येक दिवस सारखाच मी असं का म्हणतोय ? ते या लेखात थोडक्यात मांडले आहे.
सध्या सगळीकडे दीपावली मोठ्या धुमधडाक्यात साजरी केली जात आहे. या सणानिमित्ताने इतरांसारखे पत्रकार मंडळींमध्ये सुद्धा आनंदाचे वातावरण आहे. या आनंदाच्या वातावरणाला आता एक दुसरी विकृत म्हणावी अशी किनारही गेल्या काही वर्षापासून लागत आहे. ती म्हणजे, पत्रकार म्हणजे नेमके काय? त्याची पत्रकारिता क्षेत्राविषयी, वृत्तपत्राविषयी आणि समाजाविषयी आपली भूमिका काय हे सुद्धा ज्यांना कळत नाहीये, वृत्तपत्रात बातम्या लिहिणे किंवा लेख लिहिणे तर सोडा ज्यांना बातमीला शीर्षक देण्यासाठी शब्दांच्या दोन ओळी तयार करता येत नाही असे काही बेकार पत्रकार कोणत्यातरी एखाद्या वृत्तपत्राचे प्रतिनिधी किंवा उपसंपादक म्हणून गळ्यात ओळखपत्र अडकवून फिरताना सहज दिसून येतात. मात्र जे खरे पत्रकार आहेत, जे आपल्या पेशाची, लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाची धुरा अंगाखांद्यावर घेतली म्हणून पोटतिडकीने वृत्तपत्रात लिहितात अशा पत्रकारांना आपली ओळख दाखविण्याकरिता गळ्यात ओळखपत्र अडकवून फिरण्याची गरज पडत नाही. असो!
दीपावलीच्या काळात हा लेख लिहिण्याकरिता यासाठी उद्युक्त झालोय कारण की, यावेळी दीपावली निमित्ताने काही संपादक आणि पत्रकार बांधवांनी अशा तोतया पत्रकारांविषयी आपापल्या वृत्तपत्रातून चांगलीच चिरफाड करत आपापले मनोगत व्यक्त केले आहे. यात काहींनी पत्रकारितेचा मुखवटा घालून दिवाळीत चिरीमिरीचा बाजार म्हटले, तर कुणी भुरट्या पत्रकारांचा पत्रकारितेला कलंक, दिवाळी भेटवस्तू आणि पाकिटासाठी लाचारी. अशाप्रकारे आपापले मनोगत लेखणीतून व्यक्त केले आहे. असे लेख वाचून हा लेख लिहिता झालोय.
या लेखाच्या माध्यमातून माझ्या गेल्या बारा वर्षांच्या मुक्तपत्रकारितेत आलेले अनुभव वाचकांसमोर शेअर करतोय ….!
क्षेत्र कोणतेही असो त्यात काम करणारे व्यक्ती प्रामाणिक असले तर निश्चितपणे ते स्वतःचे नाव तर करतात. शिवाय त्यांच्याकडून समाजासाठी अनेक विधायक कार्य होतात. मात्र यासाठी अशा व्यक्तींच्या हृदयात व मनात एक प्रकारची तळमळ असावी लागते. अशी तळमळ असणारा व्यक्ती कधीही फक्त स्वतःपुरते पाहत नाही. तो एकावेळी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवतो परंतु समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी व सोडविण्यासाठी पुढे येतो. भलेही त्याच्या सच्च्या व प्रामाणिकपणाची कुणी अवहेलना करो की हेटाळणी करो. याच्याशी त्याला काही एक देणे-घेणे नसते. त्याच्या मनात फक्त एवढेच असते की, आपण माणूस आहोत तर माणसांसारखे राहिले पाहिजे, वागले पाहिजे, इतरांच्या कामी आले पाहिजे. असा व्यक्ती कधीही स्वतःच्या फायद्यासाठी काहीही करत नाही आणि अशा व्यक्तीच्या चांगल्या व प्रामाणिक कार्याची जाणीव शासकीय-प्रशासकीय पातळीवर असो की, राजकीय नेते, कार्यकर्ते अथवा अधिकारी आणि कर्मचारी यांना नसते असे नाही. पण तरीसुद्धा अशा चांगल्या व्यक्तींना वर उल्लेख केलेली कुणीही मंडळी जवळ करत नाही किंवा त्याच्या अडीअडचणीत कामी येत नाही. कारण तो सत्य तेच दाखवीत असतो, लिहीत असतो. आणि नेहमी म्हटले जाते की सत्य हे कडू असते जो ते दाखवीतो तो सुद्धा चुकीच्या काम करणाऱ्यांच्या नजरेत नेहमी कडूच राहतो म्हणून अशा व्यक्तीपासून चुकीचे काम करणारे किंवा भ्रष्ट असणारे लोक लांबच राहण्याचा प्रयत्न करतात आणि चांगला, साधा, सोज्वळ, खरा व प्रामाणिक पत्रकार सुद्धा अशा लोकांच्या सावलीलाही उभा राहत नाही म्हणून अशा पत्रकारांच्या पाचवीला दारिद्र्य पूजल्यासारखे राहते.
काही लोकांनी पत्रकारितेसारख्या चांगल्या क्षेत्राला गेल्या काही वर्षात जणू काही बदनाम करण्याचा विडाच उचलल्याचे दिसून येते. खरे पत्रकार राहिले बाजूला परंतु बेकार पत्रकार मात्र दीपावली सारख्या सणाच्या निमित्ताने राजकीय नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत आणि अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत प्रत्येकाकडे खेटे मारून, त्यांचे उंबरे झिजवून, फुल न फुलाची पाकळी म्हणत सणवारासाठी जे शक्य होईल ते मिळविण्याचा केविलवाना प्रयत्न करत असल्याचे दिसते. जे खरे पत्रकार आहेत, ज्यांच्या खऱ्या लेखणीला मान व पाठीला आणि मानेला कणा आहे असे पत्रकार मात्र कधीही अशाप्रकारे कोणाच्या वळचणीला चुकूनही जात नाही. हे मी अगदी छातीठोकपणे नमूद करू इच्छितो.
पत्रकारिता क्षेत्रात गेल्या बारा वर्षापासून लिखाण करीत आहे. एक तपाच्या कारकिर्दीमध्ये आजपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याने, कार्यकर्त्याने, अधिकाऱ्याने किंवा कर्मचाऱ्यांनी कधीही मला दिवाळी सणानिमित्ताने ना कधी बोलावले ना कधी एक रुपया दिला ना जाहिरात दिली तसेच सर्वात महत्त्वाच्या रमजान ईदला सुद्धा कधी कुणी ना एक रुपयाची जाहिरात दिली ना चिरीमिरी.
मी मुक्तपत्रकार म्हणून लिखाण करीत असलो तरी या क्षेत्रातील अनेक संपादक, पत्रकार, संगणक तज्ञ, छपाई मशीन तज्ञ, छायाचित्रकार अशा सर्वांशीच चांगले जवळचे व मनस्वी स्नेही संबंध असल्याने या क्षेत्रातील बरीच माहिती झालेली आहे. म्हणूनच गेल्या बारा वर्षात कधीही कोणत्याही राजकीय नेत्याशी, कार्यकर्त्याशी, अधिकाऱ्यांशी किंवा कर्मचाऱ्यांशी जवळीक साधली नाही किंवा कधी कुणाच्या वळचणीलाही बांधला गेलो नाही. म्हणून ताठ मानेने लिहिता आले व येत आहे.
जे बेकार पत्रकार आहेत ते लिखाणच करत नाही तर अशांना मान व पाठ ताठ ठेवण्याची गरजच लागत नसल्याने ते अशा प्रकारे नेते, कार्यकर्ते, अधिकारी, कर्मचारी यांच्याकडे लाचार होऊन नाही तर चोरावर मोर होत चिरीमिरीसाठी फिरतात. अशी जमात जरी अशा लोकांसमोर ते पत्रकार किंवा संपादक असल्याचे म्हणत असले तरी त्यांचा आणि पत्रकारिता क्षेत्राचा अर्थातच लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाचा खरे पाहता काही एक संबंध नसतो. तरीसुद्धा अशांच्या गळ्यात अडकवलेल्या ओळखपत्रांकडे पाहून जे नेते, कार्यकर्ते, अधिकारी आणि कर्मचारी अशांना सणानिमित्ताने असो किंवा इतर कारणाने जे काही आर्थिक लाभ देतात ते पत्रकार किंवा संपादक आहे म्हणून नव्हे तर ते पदावर असताना जे काही चुकीचे काम करतात त्याची आतील माहिती अशा वाटसरू बेकार पत्रकारांकडे असते आणि ते लिखाणा ऐवजी फक्त अशी आतील माहिती गोळा करूनच अशा लोकांकडे घिरट्या घालतात आणि वेळेवर त्यांना खिंडीत पकडून त्यांच्याकडून आर्थिक लाभ घेतात. असे भ्रष्ट लोक त्यांना आर्थिक दान करतात. ते फक्त त्यांनी केलेल्या चुकीच्या व भ्रष्ट कामांची जाहीर वाच्यता होऊ नये, समाजासमोर आपण उघडे-नागडे पडू नये, आपली नाचक्की होऊ नये, आपण पदावर असेपर्यंत सर्व काही आपल्या मनासारखे सुरळीत चालावे. याकरिता भ्रष्ट नेते, कार्यकर्ते, अधिकारी आणि कर्मचारी अशा भुरट्या पत्रकारांना सन-त्यौहाराच्या निमित्ताने चिरीमिरी देऊन स्वतःचे कातंड वाचविण्याचा प्रयत्न करतात.
अशा बेकार पत्रकारांमुळे पत्रकारिता क्षेत्र खराब झाले किंवा चांगले सच्चे आणि प्रामाणिक पत्रकारांच्या कार्यावर ताशेरे ओढले जाऊ लागले, असा समज करून घेण्याची काही एक गरज नाही. कधी ना कधी “दूध का दूध आणि पाणी का पाणी” होतच असतो. आणि जर असं नाही झालं तर “रामचंद्र कहे गये सिया से ऐसा कलजूग आयेगा, हंस चुगेगा दाना तुनका, कौआ मोती खायेगा” हे वाक्य आठवावे.
चांगले, सच्चे, खरे आणि प्रामाणिक संपादक तसेच पत्रकारांनीही अशा बाबी मनाला लावून घेऊ नये. कारण गेल्या बारा वर्षांपासूनचा माझा स्वानुभव पाहता मी हे छाती ठोकपणे सांगू शकतो की, सच्च्या व प्रामाणिक पत्रकारांना चिरीमिरी देण्याचे तर सोडा त्यांची ख्याली खुशाली सुद्धा कोणी विचारत नाही आणि तेही कोणाच्या दारी जात नाहीत. यामुळे ईद असो वा दीपावली त्यांच्यासाठी प्रत्येक दिवस सारखाच असतो हेही नक्की आणि तेवढेच खरे ….!
*लेखन – एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड


