मा. डॉ. सुभाष बोबडे (अध्यक्ष, विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगाव) यांना ‘लाइफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड’ प्रदान करताना कर्नल ओमेश शुक्ला, कमांडिंग ऑफिसर, १३ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, खामगाव.
प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख
खामगाव – शिक्षण क्षेत्रातील अढळ निष्ठा, संस्थाविकासातील दूरदृष्टी, व्यवस्थापनातील प्रामाणिकता आणि तरुण पिढीतील नेतृत्वगुण जागविण्यासाठी केलेल्या असामान्य कार्याचा गौरव म्हणून विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष आणि ज्येष्ठ शिक्षणप्रेमी डॉ. सुभाष शंकरराव (दादासाहेब) बोबडे (अध्यक्ष, विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगाव) यांना प्रतिष्ठेचा ‘लाइफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड’ ने सन्मानित करण्यात आले. १३ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, खामगाव यांच्या वतीने हा बहुमोलाचा अवॉर्ड जाहीर झाला आहे. एनसीसीच्या एका कार्यक्रमात अत्यंत प्रतिष्ठेचा हा अवॉर्ड कर्नल ओमेश शुक्ला, कमान्डिंग ऑफिसर, १३ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, खामगाव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या पुरस्काराने केवळ एका प्रतिष्ठित व्यक्तीचा सन्मान झालेला नाही, तर शिक्षण संस्थेच्या उभारणीत आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी त्यांनी केलेले अतुलनीय कार्य समाजापुढे एक आदर्शमूल्य ठरले आहे.
डॉ. सुभाष बोबडे (अध्यक्ष, विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगाव) यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात शिक्षण क्षेत्राला एक उंच दिशा दिली. आर.सी.एफ. गुजरात येथे चीफ मार्केटिंग मॅनेजर म्हणून कार्य करताना प्रामाणिकता, शिस्त, नियोजन आणि व्यवस्थापन या मूल्यांची त्यांनी जपणूक केली. २००१ मध्ये निवृत्ती घेतल्यानंतर त्यांच्यावर विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिवपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. शिस्त, प्रामाणिकपणा आणि नियोजनात्मक कार्य यांची बांधणी ही त्यांची जीवनमूल्ये आहेत. अध्यक्ष म्हणून त्यांनी संस्थेच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतला आणि आपले संपूर्ण आयुष्य शिक्षण क्षेत्रासाठी समर्पित केले.
गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी त्यांनी रचनात्मक विकासाचा पाया मजबूत केला आणि अनेक भव्य प्रकल्प महाविद्यालयासाठी साकारले. महाविद्यालयाचा स्विमिंग पूल आणि इनडोअर स्टेडियम या महत्त्वाकांक्षी योजनांची उभारणी ही त्यांची दूरदृष्टी आणि शिस्तबद्ध कामगिरीची उत्तम उदाहरणे आहेत. या सुविधा आजही हजारो विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. महाविद्यालय परिसराचे आधुनिकीकरण, सुशोभीकरण, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांचा विस्तार, शैक्षणिक गुणवत्तेचा सातत्याने होणारा विकास यामागे त्यांचे सूक्ष्म नियोजन आणि अथक परिश्रम जाणवतात.
याच काळात महाविद्यालयाला मिळालेला NAAC चा ‘A’ दर्जा हा त्यांच्या शिक्षणावरील दांडगा अभ्यास आणि संस्थेवरील प्रेमाची पावती मानला जातो. ११ फेब्रुवारी २०१९ रोजी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी संस्था आधुनिक करण्याचा आणि विद्यार्थी–शिक्षकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा उपक्रम राबविला. स्व. नरेंद्र शंकरराव बोबडे यांच्या पश्चात विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगाव च्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारताना त्यांनी संस्थेमध्ये पारदर्शकता, शिस्त आणि विकासाचा नवा अध्याय सुरू केला. शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्राच्या विस्ताराबरोबरच आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देणे, त्यांना प्रोत्साहन देणे, संस्था–विद्यार्थी–शिक्षक यांच्यात संवाद व समन्वय साधणे ही कामे त्यांनी अत्यंत संवेदनशीलतेने पार पाडली. विशेष म्हणजे, वयाची सत्याहत्तर वर्षे ओलांडूनही दररोज सकाळी टेनिस कोर्टवरील त्यांची जोशपूर्ण उपस्थिती विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरते. त्यांच्या चालण्यात, बोलण्यात, काम करण्याच्या पद्धतीत आणि आरोग्यसंपन्न जीवनशैलीतून निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा विद्यार्थ्यांना व शिक्षकांना प्रोत्साहित करते. ते आदर्श मार्गदर्शक, उत्तम प्रशासक आणि दृढनिश्चयी नेता म्हणून ओळखले जातात.
लाइफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड स्वीकारताना एनसीसी अधिकाऱ्यांनी त्यांची मनःपूर्वक प्रशंसा केली. एक प्रामाणिक, शिस्तबद्ध आणि सर्वांच्या मदतीला धावून जाणारा ‘शिक्षण योद्धा’ म्हणजे दादासाहेब बोबडे, असे कर्नल ओमेश शुक्ला यांनी या प्रसंगी गौरवोद्गार काढले. त्यांनी पुढे म्हटले की, डॉ. बोबडे यांनी तरुणांमध्ये शिस्त, नेतृत्वगुण आणि राष्ट्रीय भावना जागविण्यासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. एनसीसी उपक्रमांना त्यांनी नेहमीच मोलाचा पाठिंबा दिला. त्यांच्या प्रेरणेतून अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी करत आहेत. त्यांचे कार्य हे पुढील पिढ्यांसाठी दीपस्तंभ आहे.
डॉ. सुभाष बोबडे (अध्यक्ष, विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगाव) यांनी एनसीसी कॅडेट्सच्या प्रशिक्षणाकडे विशेष लक्ष देऊन त्यांच्यातील स्वानुशासन, जबाबदारी आणि राष्ट्रीय मूल्ये दृढ केली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला ते नेहमीच सर्वोच्च प्राधान्य देत आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीसी विभागाने अनेक उपक्रम राबविले असून, त्यातून विद्यार्थ्यांमध्ये उत्तम चारित्र्य आणि राष्ट्रसेवेचे मूल्य बळकट झाले आहे. या गौरवामुळे खामगाव शहरातील शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातून अभूतपूर्व आनंद व्यक्त होत असून, डॉ. सुभाष बोबडे (अध्यक्ष, विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगाव) यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा पुरस्कार विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळासाठीही एक अभिमानाचा क्षण ठरला आहे.
या ‘लाइफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड’बद्दल विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगावचे उपाध्यक्ष मा. प्रकाशजी तांबट, सचिव मा. डॉ. प्रशांतजी बोबडे, कोषाध्यक्ष मा. अजिंक्यदादा बोबडे, निसर्ग ग्रुप खामगावच्या अध्यक्षा सौ. निताताई बोबडे, सौ. श्रद्धाताई बोबडे तसेच मंडळाचे सर्व माननीय सदस्य यांनी डॉ. बोबडे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि महाविद्यालयीन परिवारानेही त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. “त्यांचे विचार आमच्या प्रत्येक कार्याला दिशादर्शक ठरतात आणि आम्हाला कायम प्रेरणा देतात,” असे प्राचार्यांनी याप्रसंगी सांगितले.


