उद्याच्या ‘शाळा बंद’ आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा – जितेंद्र डोंगरे आत्माराम वाव्हळ यांचे आवाहन
बीड, दि. ३ (प्रतिनिधी) – शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी उद्या, ५ डिसेंबर २०२५ रोजी जाहीर करण्यात आलेल्या राज्यव्यापी ‘शाळा बंद’ आंदोलनाला महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीने जाहीर पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय कार्याध्यक्ष जितेंद्र डोंगरे आणि बीड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आत्माराम वाव्हळ यांनी केले आहे.
टीईटी सक्ती, अन्यायकारक संचमान्यता धोरण, शिक्षकांकडून घेतली जाणारी अशैक्षणिक कामे तसेच शिक्षक–कर्मचाऱ्यांचे इतर प्रलंबित प्रश्न यावर त्वरित उपाययोजना व्हाव्यात, या मागण्यांसाठी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीने उद्या राज्यभर *‘शाळा बंद’*ची हाक दिली आहे. या आंदोलनाला समर्थन देताना विनाअनुदानित शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनीही राज्यातील सर्व विभागीय, जिल्हा व तालुका स्तरावरील पदाधिकारी, सदस्य, तसेच विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांतील शिक्षक–शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.
खंडेराव जगदाळे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत समितीचे सर्व विभागीय, जिल्हा व तालुका पदाधिकारी, सदस्य आणि शिक्षक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष वाव्हळ यांनी दिली.
शाळा बंद आंदोलनाची माहिती देताना विभागीय कार्याध्यक्ष जितेंद्र डोंगरे आणि जिल्हाध्यक्ष आत्माराम वाव्हळ म्हणाले “शिक्षण व्यवस्थेतील अन्यायकारक धोरणांविरोधात आवाज बुलंद करण्यासाठी एकजुटीने रस्त्यावर उतरले तरच शिक्षकांना न्याय मिळेल. त्यामुळे उद्याच्या शाळा बंद आंदोलनात बीड जिल्ह्यातील सर्व अनुदानित विना अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.”
___________________________________


