मिशन एक्सलन्स उपक्रम विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार : जिल्हाधिकारी वर्षा मीना

प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख
अकोला : विद्यार्थांना गुणवत्तापूर्ण अध्ययनाच्या माध्यमातून शैक्षणिक आमूलाग्र बदल घडवण्यासाठी Target PEAK (टार्गेट पीक) हे शैक्षणिक ॲप विकसित करण्यात आले असून जिल्हा वार्षिक योजना नावीन्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून मिशन एक्सलन्स उपक्रम जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता चौथी, पाचवी, सातवी आणि आठवी मधील २० हजार विद्यार्थ्यांसाठी महत्वाची भूमिका बजावणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी वर्षां मीना यांनी आज इथे केले. नियोजन भवन येथे जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक,विस्तार शिक्षण अधिकारी यांची शैक्षणिक ॲप संदर्भात कार्यशाळा घेण्यात आली यावेळी त्या बोलत होत्या.जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर,शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार उपशिक्षणाधिकारी श्री.प्रधान, मुख्यमंत्री कार्यालय फेलो भारसकर आदी उपस्थित होते. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षण,प्रश्नोत्तरे आणि उत्तरे, विशेष व्याख्याने ह्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी प्रयत्न केले जाणार असून शिष्यवृत्ती,नवोदय, एनएमएमएस यासह महत्त्वपूर्ण परीक्षांमध्ये अकोला जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा टक्का वाढावा तसेच विद्यार्थ्यांना एका क्लिकवर शिष्यवृत्ती परीक्षेबाबत अध्ययन करता यावे या उद्देशाने सर्व शाळांमध्ये या शैक्षणिक ॲपचा वापर करावा तसेच शैक्षणिक गुणवत्तेबाबत वेळोवेळी तपासणी करावी असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी दिले.


