- अमरावती विभागातुन गो. से. महाविद्यालयाच्या कु. धनश्री मिश्राची “दिल्ली वॉरियर” म्हणून अभ्यास दौरा संपन्न
प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख
खामगाव :- महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या दिल्ली अध्ययन दौर्यासाठी बुलढाणा जिल्ह्या विभागातून गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगाव येथील धनश्री राजेश मिश्रा (वर्ग : बी.कॉम द्वितीय वर्ष) यांची निवड झाली होती . “नजरे समोर राष्ट्र, हृदयात महाराष्ट्र” या नावाने आयोजित करण्यात आलेला हा अभ्यास दौरा २५ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत पार पडला. या उपक्रमांतर्गत संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागा मधुन १० विद्यार्थ्यांची टीम दिल्ली येथे पाठविण्यात आली होती. विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास, शैक्षणिक गुणवत्ता, नेतृत्वगुण, सामाजिक जाण आणि संवादकौशल्य आदी बाबींचे मूल्यांकन करून ही निवड करण्यात आली होती. या दौर्यात धनश्री मिश्रा यांनी विविध प्रशासकीय विभाग, सुरक्षादल तसेच राष्ट्राच्या महत्त्वाच्या संस्था भेट देऊन व्यापक अभ्यास केला. यामध्ये महाराष्ट्र सदन, अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण मंडळ (AICTE), पंतप्रधान संग्रहालय, राष्ट्रपती भवन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, दिल्ली विद्यापीठ, राष्ट्रीय पोलीस स्मारक, सीआरपीएफ कार्यालय-संग्रहालय- प्रशिक्षण केंद्र, इंडिया गेट, जंतर-मंतर अशा महत्त्वपूर्ण ठिकाणांचा समावेश होता. दौर्यादरम्यान धनश्री यांनी उच्चपदस्थ सरकारी अधिकारी, आयपीएस, आयएएस तसेच सैन्य अधिकारी यांचा समावेश होता. प्रमुख मुलाखत दिलेल्यांमध्ये –योगेश ब्रह्मणकर (संचालक – इनोव्हेशन सेल), तुषार शिंदे IRPS अधिकारी),चेतन शेलोतकर ( असिस्टंट कमांडर CRPF),संतोष चालके ( IPS अधिकारी) इत्यादी व्यक्तींची मुलाखत घेतली. या उपक्रमांत सहभागी होण्याची संधी मिळणे म्हणजे यू. पी. एस. सी सारख्या परीक्षा कार्यशैली पासून प्रशासनापर्यंत आपली छाप उमटविण्याची व आपले मनोधैर्य वाढविण्याची सुवर्णसंधी लाभ विद्यार्थ्यांना मिळते. वाढत्या स्पर्धेच्या वातावरणात अशा प्रकारच्या कार्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचे काम होते. या दौर्यातून राष्ट्रकारभार, प्रशासकीय कार्यपद्धती, सुरक्षा व्यवस्था तसेच शैक्षणिक व तांत्रिक संस्था यांचे प्रत्यक्ष ज्ञान घेण्याची संधी मिळाल्याचे धनश्री यांनी सांगितले. अमरावती विभागाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याने त्यांना मोठा सन्मान वाटत असल्याचे त्यांनी नमूद केले. धनश्री मिश्रा या कॉमर्स आणि मॅनेजमेंट विभागाच्या विद्यार्थिनी आहेत आणि गो. से. महाविद्यालयातील करिअर कट्टा संसदेच्या मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचा कॉमर्स आणि मॅनेजमेंट विभागाचे प्रमुख डॉ. डी. एन. व्यास आणि सर्व प्राध्यापकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अशा उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना नेतृत्व, राष्ट्रप्रेम तसेच करिअर उन्नतीची प्रेरणा मिळत असून धनश्री यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख यांनी दिली आहे.



