प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख
खामगाव :- विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगावद्वारे संचालित गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (NSS) पथकाच्या वतीने थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून करण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी संत गाडगेबाबांच्या जीवनकार्यावर आधारित वक्तृत्व स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. समाजसेवा, स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन व शिक्षणाचे महत्त्व या विषयांवर विद्यार्थ्यांनी आपले विचार प्रभावीपणे मांडले. कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा. डॉ. डी. टी. अढाऊ यांनी केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. धनंजय तळवणकर होते. विचारपीठावर संचालक मंडळाचे सदस्य मा. डॉ. एन. एस. महल्ले, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. नीता बोचे, प्रा. डॉ. डी. टी. अढाऊ तसेच प्रा. उमेश खंदारे हे प्रामुख्याने उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य मा. डॉ. धनंजय तळवणकर यांनी संत गाडगेबाबांच्या जीवनकार्यावर सविस्तर प्रकाश टाकला. निस्वार्थ सेवा, स्वच्छता व सामाजिक समतेचा संदेश देणारे संत गाडगेबाबांचे विचार आजच्या तरुण पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी असून विद्यार्थ्यांमध्ये सेवा वृत्ती निर्माण करण्यासाठी ते आत्मसात करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. अंधश्रद्धा निर्मूलन व शिक्षण क्षेत्रातील त्यांचे कार्य आजही समाजाला दिशा देणारे आहे. स्वच्छता अभियानाचे आद्य प्रणेते म्हणून संत गाडगेबाबा ओळखले जातात, हेही त्यांनी अधोरेखित केले. कार्यक्रमास विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. डॉ. दादासाहेब बोबडे व सचिव मा. प्रशांतजी बोबडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी प्रा. डॉ. आठवर, प्रा. अमित शिंदे, प्रा. डॉ. हरगुणानी, प्रा. मोरे, प्रा. भुतेकर, प्रा. सुहास पिढेकर, प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख, आदी प्राध्यापक उपस्थित होते. वक्तृत्व स्पर्धेत कु. रूपाली पहुरकर, कु. धनश्री पिवळटकर, कु. दीक्षा खोडे, कु. खुशी व्यवहारे, कु. सेजल सातपुते यांनी सहभाग घेतला. निबंध स्पर्धेत धनश्री पिवळटकर, सोनल दामोदर, प्रियंका सावळे, सोनाली कळसकार, अनुजा देवकर, स्वाती धुळे, स्नेहल तळपटे, प्रिया अवथळे, सागर धंधरे व धनश्री राठोड यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री पिवळटकर हिने केले तर आभारप्रदर्शन सोनाली कळसकार हिने केले. कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक व स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.


