मिल्लीया महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
विद्यार्थ्यांनी शिक्षण, समानता व सामाजिक बांधिलकी यांचे मूल्य आत्मसात करावे – प्राचार्य डॉ.मोहम्मद इलयास
बीड: येथील मिल्लिया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मोहम्मद इलयास फाजील, प्रमुख अतिथी म्हणून वसंतदादा पाटील महाविद्यालयाचे प्राणीशास्त्र विभाग प्रमुख प्रोफेसर प्रेमचंद शिरसाट, उपप्राचार्य प्रोफेसर हुसैनी एस.एस, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रोफेसर रमेश वारे, प्रा. शोएब पीरजादे, डॉ. शामल जाधव यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी डॉ. शामल जाधव यांनी केले. त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांचे महिला शिक्षण व समाजसुधारणेसाठीचे महान कार्य अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, महिला शिक्षण हे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. तसेच बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचे उद्दिष्ट मुलींचे संरक्षण, संगोपन व शिक्षण यावर आधारित असल्याचे स्पष्ट केले.
प्रमुख अतिथी प्रोफेसर डॉ. प्रेमचंद शिरसाट यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर केवळ एक महान विद्वान नव्हते, तर एक समाजसुधारक, अर्थतज्ज्ञ आणि कायदेतज्ज्ञही होते. भारतीय संविधानाची निर्मिती करून त्यांनी देशाला समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता यांचे मूल्य दिले, त्यांनी आयुष्यभर अस्पृश्यता, अन्याय आणि भेदभावाविरुद्ध संघर्ष केला. “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा त्यांचा संदेश आजही प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर अन्याय, अत्याचार आणि अस्पृश्यतेविरुद्ध लढा दिला. शिक्षण हेच माणसाच्या प्रगतीचे खरे साधन आहे हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. इलयास फाजील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण, समानता आणि सामाजिक बांधिलकी यांचे मूल्य आत्मसात करण्याचे आवाहन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक न्याय, महिला सक्षमीकरण व वंचित घटकांच्या उन्नतीसाठी दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकला. तसेच विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचे अनुकरण करावे व शिक्षणाचे महत्त्व ओळखावे असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेची कार्यक्रमाधिकारी डॉ.रमेश वारे यांनी तर आभार डॉ. शामल जाधव यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद,कर्मचारी वृंद, विद्यार्थी- विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती.


