उर्दू माध्यमातील रिक्त पदे भरली जाणार, निवृत्त शिक्षकांच्या लाभवाटपात सेवाज्येष्ठतेला प्राधान्य – मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान
बीड, दि. ५ जून २०२६ (प्रतिनिधी) :
अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषद बीडचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान यांची भेट घेऊन जिल्हा परिषद शाळांमधील उर्दू माध्यमाच्या रिक्त पदांसंदर्भात चर्चा केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उर्दू माध्यमातील रिक्त पदांची माहिती पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यात येणार असल्याचे सांगितले.
संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील १२ उर्दू माध्यमिक शाळांमधील रिक्त माध्यमिक शिक्षक पदांची माहितीही पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. या शाळांमध्ये शिक्षकांचे अनेक पदे रिक्त असून ती तातडीने भरण्याची आवश्यकता असल्याचे संघटनेने निदर्शनास आणून दिले.
तसेच, सेवानिवृत्त होणाऱ्या सर्व शिक्षकांची जिल्हास्तरीय यादी तयार करून सेवाज्येष्ठतेनुसार उपदान (ग्रॅच्युइटी) व अंशराशीकरणाच्या रकमेचे वाटप करण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली.
संघटनेच्या म्हणण्यानुसार, सध्या सेवानिवृत्त शिक्षकांना निवृत्तीवेतनाशी संबंधित लाभ मिळण्यात मोठा विलंब होत आहे. अनेकदा आधी सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना लाभ उशिरा मिळतात, तर नंतर सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना ते आधी मिळतात. त्यामुळे ज्येष्ठ शिक्षकांवर अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाली आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान यांनी सकारात्मक भूमिका घेत यापुढे लाभांचे वितरण सेवाज्येष्ठतेनुसार करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले.
या निर्णयामुळे बीड जिल्ह्यातील शेकडो सेवानिवृत्त शिक्षकांना त्यांच्या हक्काचे आर्थिक लाभ वेळेत व सन्मानाने मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. तसेच उर्दू माध्यमातील रिक्त पदांची माहिती पवित्र पोर्टलवर उपलब्ध झाल्यानंतर भरती प्रक्रियेला गती मिळेल. परिणामी उर्दू शिक्षणाचा दर्जा उंचावण्यास मदत होईल आणि पात्र उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
संघटनेच्या या पाठपुराव्यामुळे शिक्षक वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेचे स्वागत करण्यात येत आहे.
यावेळी काजी अब्दुल माजेद, एम. झेड. खतीब, काझी मुशाहेद, उस्मान खान, मोमीन अब्दुल करीम, मोमीन अलीमोद्दीन, मोमीन जावेदमिया, शेख इमरान, मोमीन खैसर तसेच अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.


