०५ डिसेंबरच्या “शाळा बंद” आंदोलनाला क्रांतिकारी शिक्षक संघटनेचा ठाम पाठिंबा
बीड:
महाराष्ट्रातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे सातत्याने होत असलेले दुर्लक्ष लक्षात घेता, दि. ०५ डिसेंबर २०२५ रोजी राज्यव्यापी “शाळा बंद” आंदोलन जाहीर करण्यात आले असून या आंदोलनाला क्रांतिकारी शिक्षक संघटनेने ठाम पाठिंबा जाहीर केला आहे.
शिक्षकांवर टेटची सक्ती, अव्यवहार्य शासनमान्यता धोरण, अराजकीय कामांचा वाढता बोजा, जुनी पेन्शन योजना लागू करण्यातील विलंब, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची दीर्घकाळ न भरलेली रिक्त पदे, तसेच कमी विद्यार्थी संख्या दाखवून शाळा बंद करण्याचे धोरण—या सर्व मुद्द्यांवर समाधानकारक तोडगा न निघाल्यामुळे राज्यातील शिक्षकवर्गात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
शिक्षक व शिक्षकेत्तर संघटना समन्वय समितीतर्फे जाहीर करण्यात आलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविताना क्रांतिकारी शिक्षक संघटनेचे संस्थापक सचिव कादरी शाहेद यांनी सर्व पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व सदस्यांना मोठ्या संख्येने आणि शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
“न्याय्य हक्कांसाठीचा हा लढा निर्णायक टप्प्यावर असून प्रभावी आंदोलनासाठी सर्वांचा सहकारी सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे,” असे कादरी शाहेद यांनी म्हटले आहे.
या आंदोलनामुळे राज्यातील अनेक शाळा बंद राहण्याची शक्यता असून शिक्षकवर्गाच्या मागण्यांवर शासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


