परळी संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई; अवैध दारूसाठ्यावर छापा, ₹2.19 लाखांचा मुद्देमाल जप्त
PLN NEWS
परळी शहरातील संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारूविक्रीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ₹2 लाख 19 हजार 220 रुपयांचा देशी–विदेशी दारूसाठा जप्त केला आहे. या प्रकरणी एक आरोपी अटकेत असून त्याच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संभाजीनगर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 259/2025, कलम 65 (e) म.दा. कायदा अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात संदीप उत्तमराव चव्हाण (वय 38), पोलीस उपनिरीक्षक, पोलीस ठाणे संभाजीनगर, परळी यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दि. 19 डिसेंबर 2025 रोजी रात्री 8.45 वाजता, परळी वैजनाथ येथील हॉटेल आबासाहेबच्या पुढील पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकण्यात आला. या छाप्यात ईश्वर रेशमाजी बहीरे (वय 35, रा. कन्हेरवाडी, ता. परळी वै., जि. बीड) याला ताब्यात घेण्यात आले.
छाप्यात विविध नामांकित कंपन्यांची देशी व विदेशी दारू मोठ्या प्रमाणात आढळून आली. यामध्ये रॉयल स्टॅग, मॅगडॉल, ओल्ड बॉम्बे, इम्पेरियल ब्ल्यू, आयकॉनिक व्हाईट, आफ्टर डार्क ब्ल्यू, संत्रा, टँगो पंच, रूस्तुम गोल्ड, मॅजिक मुव्हमेंट आदी कंपन्यांच्या एकूण अनेक बॉक्समधील 180 एम.एल.च्या शेकडो बाटल्या जप्त करण्यात आल्या. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत ₹2,19,220/- इतकी आहे.
सदर गुन्हा दि. 20 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10.34 वाजता दाखल करण्यात आला असून पुढील तपास संभाजीनगर पोलीस करत आहेत. शहरात अवैध दारूविक्रीविरोधात पोलिसांनी कडक कारवाई सुरूच ठेवली असल्याचे सूत्रांनी सांगितले.


