गेवराई पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
- दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी अटकेत; सुमारे 1.97 लाखांचा मुद्देमाल जप्त
गेवराई (जि. बीड) :
पोलीस ठाणे गेवराई गुरनं. येथे दाखल गुन्हा क्रमांक 629/2025, कलम 304, 3(5) भारतीय न्याय संहिता-2023 अंतर्गत दरोड्याच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक करून चोरीस गेलेला मुद्देमाल तसेच इतर गुन्ह्यातील चोरीच्या दोन मोटारसायकली असा एकूण 1,97,300 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात गेवराई पोलिसांना यश आले आहे.
दिनांक 23/10/2025 रोजी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, फिर्यादी, त्यांची पत्नी व मुलगा हे होंडा शाईन मोटारसायकलवर छत्रपती संभाजीनगर येथून बीडकडे जात असताना सायंकाळी सुमारे 7.10 वाजता पाचोड टोलनाका ओलांडल्यानंतर काळ्या रंगाच्या बजाज पल्सर मोटारसायकलवरील तिघांनी त्यांचा पाठलाग केला. संशय आल्याने फिर्यादी जालना फाटा येथे थांबले. पुढे राक्षसभूवन फाट्याच्या पुढे आल्यानंतर आरोपींनी फिर्यादीची मोटारसायकल थांबवून त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सुमारे 10 ग्रॅम वजनाचे मणीमंगळसूत्र जबरदस्तीने चोरून नेले.
या गुन्ह्याच्या तपासासाठी गुप्त बातमीदार व तांत्रिक तपासाचा आधार घेत पोलिसांनी
1. कुलदीप उर्फ भोला अर्जुन पवार (वय 23, रा. राहेरा, ता. घनसांगवी, जि. जालना, सध्या मयूर पार्क, छत्रपती संभाजीनगर)
2. विशाल यशवंत पवार (वय 18, रा. सातोना (खु), ता. परतुर, जि. जालना)
यांना अटक केली.
आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी एका फरार साथीदारासह सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपी क्रमांक 1 याच्याकडून 18,300 रुपये रोख रक्कम, तर आरोपी क्रमांक 2 याच्याकडून 1.5 ग्रॅम वजनाचे जुने वापरते मणीमंगळसूत्र (किंमत अंदाजे 19,000 रुपये) जप्त करण्यात आले.
पोलिस कोठडीदरम्यान अधिक तपासात आरोपींनी गुन्ह्यासाठी वापरलेली मोटारसायकल मुकुंदवाडी परिसर, छत्रपती संभाजीनगर येथून चोरी केल्याचे तसेच पोलीस ठाणे तलवडा गुरनं. हद्दीतून होंडा शाईन (किंमत 60,000 रुपये) व मुकुंदवाडी पोलीस ठाणे हद्दीतून होंडा युनिकॉर्न (किंमत 1,00,000 रुपये) मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली.
सदर गुन्ह्याचा तपास मा. पोलीस अधीक्षक श्री. नवतीनत काँवत, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर, पोलीस उप अधीक्षक श्री. अभिजीत कटके, पोलीस निरीक्षक श्री. किशोर पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. संतोष जंजाळ व सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. दीपक लंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार 954 हंबर्डे, पोलीस कॉन्स्टेबल 2198 धिरज खांडेकर व पोलीस कॉन्स्टेबल 241 गोरख डोके यांनी केला.
मा. न्यायालयाने दोन्ही आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली असून पुढील तपास सुरू आहे.


