प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख
खामगाव : विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगाव संचलित गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगाव येथील महिला सक्षमीकरण व उद्योजकता विकास समितीच्या वतीने आयोजित “जागर स्त्री–पुरुष समानतेचा सप्ताह” (दिनांक ३ ते १२ जानेवारी २०२६) या विशेष सप्ताहाचा समारोप कार्यक्रम दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी उत्साहात पार पडला. या समारोपीय कार्यक्रमात माँ जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. या समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मा. सौ. श्रद्धाताई प्रशांत बोबडे (सदस्या, विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगाव) तसेच मा. नीताताई बोबडे (संस्थापिका, निसर्ग संस्था, खामगाव) उपस्थित होत्या. प्रमुख वक्ते म्हणून डॉ. किशोर वानखडे (इतिहास संशोधक) यांनी मार्गदर्शन केले. या विशेष सप्ताहांतर्गत सावित्रीबाई फुले जयंती, निबंध स्पर्धा, स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्ग, पथनाट्य, उद्योजकता मार्गदर्शन, पतंगोत्सव, शिवणकला व फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण वर्ग, तसेच माँ जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या सर्व उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये समानता, स्वावलंबन, नेतृत्वगुण आणि सामाजिक जाणीव वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. समारोपीय कार्यक्रमाची सुरुवात माँ जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करून झाली. दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी जयंतीनिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात “सशक्त युवा पिढी घडवणारा जिजाऊ व विवेकानंदांचा दृष्टिकोन” या विषयावर डॉ. किशोर वानखडे यांनी विद्यार्थ्यांना माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या विचार–कृतींचे सखोल विवेचन केले. या विचारांच्या आधारे आजचा युवक मूल्याधिष्ठित, कर्तव्यनिष्ठ व राष्ट्रनिर्मितीसाठी सज्ज कसा घडू शकतो, याबाबत त्यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुण्या मा. सौ. श्रद्धाताई प्रशांत बोबडे यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी कृतिशील, प्रयत्नशील व संवेदनशील नागरिक बनावे, स्त्री–पुरुष समानतेचा विचार केवळ संकल्पनेपुरता न ठेवता प्रत्यक्ष कृतीत उतरवावा, तसेच शिक्षणाबरोबरच सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवावी, असा संदेश दिला. त्यांच्या मते, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण विकसित होऊन समाजपरिवर्तनाची सकारात्मक दिशा निश्चित होते. तसेच प्रमुख पाहुण्या मा. नीताताई बोबडे यांनी विद्यार्थ्यांना उद्योगशील, स्वावलंबी व नवोपक्रमशील होण्याचे आवाहन केले. उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करून स्वतःची क्षमता ओळखावी व समाजोपयोगी उपक्रमांतून स्वतःचा तसेच समाजाचा विकास साधावा, असे त्यांनी प्रतिपादन केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर यांनी विद्यार्थ्यांना किमान एक नवा संकल्प ठरवून तो पूर्ण करण्याचा ध्यास घ्या, नियमित विविध पुस्तकांचे वाचन करा व सतत आत्मविकासासाठी प्रयत्नशील राहा, असा प्रेरक संदेश दिला. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो, असेही त्यांनी नमूद केले. सप्ताहांतर्गत राबविण्यात आलेल्या “जागर स्त्री शक्तीचा” पथनाट्य उपक्रमातील एकूण १३ सहभागी विद्यार्थ्यांना व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे व मेडल प्रदान करण्यात आले. तसेच पतंगोत्सव उपक्रमांतर्गत पतंग सजावट व पतंग संदेश या स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षीस स्वरूपात मेडल देण्यात आले. करिअर कट्टा अंतर्गत राबविण्यात आलेल्या “Nothing is waste” या प्रशिक्षण वर्ग पूर्ण करणाऱ्या एकूण १४ प्रशिक्षणार्थींना देखील प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सप्ताह अहवाल वाचन महिला सक्षमीकरण व उद्योजकता विकास समितीच्या समन्वयक डॉ. रेश्मा मारवाडी यांनी केले. सूत्रसंचालन कु. मुक्ता भोजने व कु. दीक्षा खोडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. रुचिका कारंजकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्रा. संगीता वायचाळ, प्रा. कोमल काळे, डॉ. रोहिणी धरमकर, प्रा. पुनम तिवारी, प्रा. जयश्री हेडा, प्रा. रुचिका कारंजकर, प्रा. वैष्णवी साहू, प्रा. पायल भन्साली, कु. भाग्यश्री सापधारे, श्री. अभय मोहिते व श्री. विठ्ठल चंदनकर यांनी मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



