एशिया न्यूज बीड

सौ. अपर्णाताई सागर फुंडकर यांच्या हस्ते उद्या टिळक स्मारकात विद्यार्थी उत्पादन प्रदर्शनी व विक्रीचे उद्घाटन

सौ. अपर्णाताई सागर फुंडकर यांच्या हस्ते उद्या टिळक स्मारकात विद्यार्थी उत्पादन प्रदर्शनी व विक्रीचे उद्घाटन

खामगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे – सौ. श्रद्धाताई प्रशांत बोबडे यांचे आवाहन

प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख

खामगाव :- स्व. नरेंद्रजी उपाख्य बाबासाहेब बोबडे (माजी नगराध्यक्ष, नगरपरिषद खामगाव तसेच माजी अध्यक्ष, विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगाव) यांच्या स्मृतिदिनानिमित्त गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या वतीने दि. १७ व १८ जानेवारी २०२६ रोजी दोन दिवसीय विद्यार्थी उत्पादन प्रदर्शन व विक्री (Exhibition cum Sale) उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम टिळक स्मारक येथे संपन्न होणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन मा. सौ. अपर्णाताई सागर फुंडकर (नगराध्यक्ष, नगरपरिषद खामगाव) यांच्या शुभहस्ते शनिवार, सकाळी ११ वाजता होणार आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ. सुभाषजी बोबडे (अध्यक्ष, विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ), मा. प्रकाशजी तांबट (उपाध्यक्ष), सचिव मा. डॉ. प्रशांतजी बोबडे, कोषाध्यक्ष मा. अजिंक्यदादा बोबडे, निसर्ग ग्रुप खामगावच्या अध्यक्षा सौ. निताताई बोबडे, सौ. श्रद्धाताई प्रशांत बोबडे तसेच मंडळाचे सर्व माननीय सदस्य उपस्थित राहणार आहेत. स्व. बाबासाहेब बोबडे यांनी शिक्षण, समाजसेवा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेले मोलाचे योगदान स्मरणात राहावे व त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचावा, या उदात्त हेतूने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांमध्ये केवळ शैक्षणिक गुणवत्ता नव्हे तर स्वावलंबन, शिस्त, सामाजिक बांधिलकी व उद्योजकीय दृष्टिकोन विकसित व्हावा, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांना अभिवादन म्हणून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला व उद्योजकतेला चालना देणारे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या दोन दिवसीय उपक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या नाविन्यपूर्ण, उपयुक्त व आकर्षक उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांसाठी विशेष आकर्षण ठरणारे घरगुती व चविष्ट खाद्यपदार्थांचे स्टॉल्सही उपलब्ध असतील. या प्रदर्शनातील सर्व स्टॉल्स विद्यार्थ्यांनीच उभारलेले असून उत्पादन निर्मितीपासून विक्री, आर्थिक नियोजन व व्यवस्थापनाची संपूर्ण जबाबदारी विद्यार्थ्यांनी स्वीकारली आहे. त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष बाजारपेठेचा अनुभव मिळून आत्मविश्वास, नेतृत्वगुण व स्वावलंबन अधिक दृढ होणार आहे. कार्यक्रमाच्या आयोजिका सौ. श्रद्धाताई प्रशांत बोबडे यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना व उद्योजकीय क्षमतेला वाव देण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज आहे. या प्रदर्शनातून त्यांच्या भविष्यातील उद्योजकतेची भक्कम पायाभरणी होईल.” तर मा. डॉ. सुभाषजी बोबडे यांनी, “अशा उपक्रमांमुळे विद्यार्थी भविष्यात नोकरी शोधणारे नव्हे तर नोकरी देणारे उद्योजक बनतील,” असे नमूद केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर यांनीही कौशल्याधिष्ठित शिक्षणाच्या दृष्टीने या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे मनोबल वाढावे व त्यांच्या कर्तृत्वाला योग्य प्रोत्साहन मिळावे, यासाठी खामगाव शहर व परिसरातील नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी या दोन दिवसीय प्रदर्शनास आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. विविध नाविन्यपूर्ण उत्पादनांनी सजलेले हे प्रदर्शन खामगावकरांसाठी निश्चितच आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.

contributor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *