खामगाव:-विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या वतीने स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी त्यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनंजय तळवणकर अध्यक्षस्थानी होते. यावेळी एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. डी. टी. अढाऊ, प्रा. भुतेकर, प्रा. उमेश खंदारे, प्रा. अमित शिंदे व प्रा. डॉ. टकले उपस्थित होते. मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. धनंजय तळवणकर यांनी स्वामी विवेकानंद यांच्या आत्मविश्वास, राष्ट्रनिष्ठा व चारित्र्यनिर्मितीच्या विचारांवर तसेच राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारक्षम व दूरदृष्टीपूर्ण मातृत्वावर प्रकाश टाकला. “अपयश अंतिम नसते, जोपर्यंत प्रयत्न थांबत नाहीत,” असे प्रतिपादन त्यांनी केले. प्रमुख पाहुणे प्रा. भुतेकर सर यांनी स्वामी विवेकानंदांचे विचार तरुणांना आत्मबळ देतात, तर राजमाता जिजाऊंचे जीवन त्याग, संस्कार व राष्ट्रसेवेची प्रेरणा देते, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा. डॉ. डी. टी. अढाऊ यांनी केली. यावेळी विवेकानंद जयंती सप्ताहानिमित्त व्याख्यानमाला व निबंध स्पर्धेचे आयोजन केल्याची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय डॉ. दादासाहेब बोबडे व सचिव सन्माननीय डॉ. प्रशांतजी बोबडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सोनल कळस्कर हिने केले तर कु. धनश्री हिने आभार मानले. कार्यक्रमास प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व एन. एस. एस. स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.