केज येथे लवकरच होणार ई-बस आगार; आ. नमिताताई अक्षय मुंदडा यांच्या पाठपुराव्याला यश!
केज: केज शहरात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे नवीन ई-बस आगार आणि चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे. आमदार नमिता मुंदडा यांनी केज येथे स्वतंत्र आगार निर्मितीसाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याची दखल घेत महामंडळाने या प्रस्तावावर कार्यवाही सुरू केली आहे. मुख्यमंत्री सचिवालयाकडून प्राप्त झालेल्या निर्देशांनुसार, महामंडळाच्या ५१५० ई-बस प्रकल्पांतर्गत केज येथे हे अत्याधुनिक आगार प्रस्तावित करण्यात आले असून, यामुळे परिसरातील प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.
सध्या केज हे तालुक्याचे ठिकाण असून येथे केवळ बसस्थानक कार्यरत आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी धारूर, कळंब आणि अंबाजोगाई या जवळच्या आगारांतून बससेवा पुरवली जाते. मात्र, वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक हिताचा विचार करून नमिताताई अक्षय मुंदडा यांनी स्वतंत्र आगाराची मागणी लावून धरली होती. या मागणीची दखल घेत महामंडळाने केज येथे ई-बस आगार उभारून तेथून सुमारे २८ नियते (शेड्युल) चालवण्याचे नियोजन केले आहे. या निर्णयामुळे केज शहरासह ग्रामीण भागातील दळणवळण यंत्रणा अधिक सक्षम होणार असून पर्यावरणपूरक बससेवा प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार आहे.
या निर्णयाबद्दल आ. नमिताताई अक्षय मुंदडा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि मंत्री पंकजाताई मुंडे यांचे आभार मानले आहेत.


