बीड (प्रतिनिधी)
दि.१ : मी मुख्यमंत्री असताना बीडच्या विकासासाठी कधीही भेदभाव केला नाही. पंकजाताई मुंडे पालकमंत्री होत्या. डॉ.भारतभूषण क्षीरसागर नगराध्यक्ष आणि जयदत्त क्षीरसागर आमदार असताना जिल्ह्याला भरघोस निधी दिला. स्व.गोपीनाथ मुंडे यांचा जिल्हा असल्याने बीडसाठी नेहमीच विशेष तरतूद केली. आता पुन्हा एकदा कमळाला मतदान करा, बीडच्या विकासासाठी कुठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
बीड नगरपरिषद निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने सोमवारी (दि.१) आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. मतदानाच्या आदल्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या सभेमुळे शहरात भाजपमय वातावरण झाले असून भाजपने प्रचंड शक्तीप्रदर्शन केले. ही सभा भाजपच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारी ठरली.
व्यासपीठावर भाजप नेत्या पंकजाताई मुंडे यांच्यासह आ.सुरेश धस, माजी मंत्री बदामराव पंडित, केशवराव आंधळे, बाळराजे पवार, आदित्य सारडा, राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी, डॉ.योगेश क्षीरसागर, सलीम जहांगीर, जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, ॲड.सर्जेराव तांदळे, नवनाथ शिराळे, डॉ.सारिकाताई क्षीरसागर, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ.ज्योती घुंबरे, गेवराईच्या उमेदवार गीताभाभी पवार, माजलगावच्या उमेदवार डॉ. संध्या मेंडके, धारूरचे उमेदवार रामचंद्र निर्मळ यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, डॉ.ज्योती घुंबरे नगराध्यक्ष झाल्यानंतर बीडसाठी अतिरिक्त पाणीपुरवठा योजना राबवली जाईल. प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पाणी पोहोचवण्याचे नियोजन करण्यात येईल. नगरपरिषदेच्या हद्दवाढ भागासाठी स्वतंत्र निधी दिला जाईल. डॉ.योगेश क्षीरसागर व डॉ. ज्योती घुंबरे यांच्या नेतृत्वाखाली सर्व बेघर नागरिकांसाठी घरकुल योजनेचा मोठा प्रकल्प हाती घेतला जाईल. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य सरकारने सर्वसामान्यांच्या हिताच्या असंख्य योजना राबवून कोट्यवधी रुपये खर्च केले. या योजना घराघरात पोहोचवल्या. ‘लाडकी बहीण’ योजना सरकार असेपर्यंत सुरुच राहील. पुढील टप्प्यात महिलांना ‘लखपती दीदी’ बनवण्याचा कार्यक्रम राबवण्यात येणार असून पुढील वर्षात हजारो महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम केल्या जातील. डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या मागणीनुसार बचत गटांसाठी मॉल उभारण्यात येणार आहे. डॉ.ज्योती घुंबरे या उच्चशिक्षित असून त्यांच्या नेतृत्वाखाली बीड नगरपरिषदेचा कायापालट होईल. नरेंद्र मोदी यांचे विकासाचे व्हिजन थेट बीडमध्ये राबवण्यासाठी भाजपला संधी द्या. मतदानाच्या दिवशी कमळ चिन्हासमोरील बटन दाबून भाजपच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. यावेळी लाडक्या बहिणीसह नागरिकांची मोठ्या संख्येने गर्दी होती. या सभेचे यशस्वी नियोजन उद्योजक गौतम कांबळे यांच्या ‘विजया इव्हेंट’ कंपनीने केले होते. दरम्यान, सभेला येण्यासाठी प्रत्येक प्रभागातील नागरिक उत्सुक दिसून आले, बीड शहराच्या विविध भागातून नागरिक रॅली काढून घोषणाबाजी करत सभास्थळी दाखल झाले.
चौकट
भाजपची सत्ता येताच बिंदुसरा नदीचा कायापालट करणार : पंकजाताई मुंडे
डॉ.योगेश, सारिका यांनी विधासनभा लढविली, अल्पशा मतांनी त्यांचा पराभव झाला. त्यांच्या जुन्या पक्षाने त्यांना अडचणीत आणले. त्या अडचणींमुळे या दांपत्याने भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांना पक्षात घेऊन बीड नगरपरिषद निवडणुकीची जबाबदारी दिली. भाजपमध्ये राष्ट्रवादाला स्थान असून गुंडागर्दीला स्थान नाही. बीडसह जिल्ह्यात भाजपने नगरपरिषद निवडणुकीसाठी स्वच्छ चेहरे दिले. बीड जिल्ह्याच्या विकासात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कायम साथ लाभली. रेल्वे, राष्ट्रीय महामार्गांचे जाळे, पाणीपुरवठा योजनांना कोट्यवधींचा निधी दिला. बिंदुसरा नदीचा कायापालट करण्याचा आपण शब्द दिला आहे. तो पूर्णत्वास नेईल. बीड जिल्ह्यात अनेक देवस्थाने, शक्तिपीठे आहेत. जिल्ह्याने देशाला स्व.गोपीनाथ मुंडे, स्व.प्रमोद महाजन यांसारखे रत्न दिले. स्व.केशरकाकू, स्व.विमलताई, रजनीताई, प्रीतमताई यांसारख्या महिलांना नेतृत्व करण्याची संधी दिली. इतक्या चांगल्या बीडला राजकारणामुळे बदनाम करण्याचं काम झालं. गल्लीपासून दिल्लीपर्यंत कमळ फुलले आहे, आता बीड नगरपरिषदेतही कमळ फुलणार आहे, असा विश्वास भाजप नेत्या पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केला.
चौकट
आता देवेंद्र फडणवीस, पंकजाताई मुंडेंनी बीडचे पालकत्व घ्यावे -डॉ.योगेश क्षीरसागर
आजपर्यंत आम्ही बीड शहराची सेवा केली. यापुढेही बदलत्या बीडचा विकास करण्यासाठी कटिबद्ध आहोत. त्यासाठी मुख्यमंत्री, पंकजाताईंची साथ लागणार आहे. बीड नगरपरिषदेमार्फत आजपर्यंत झालेल्या विकासामध्ये मुख्यमंत्री व पंकजाताईंचा मोलाचा वाटा आहे. येणाऱ्या काळातही त्यांनी बीडचे पालकत्व घ्यावे, अशी भावना डॉ.योगेश क्षीरसागर यांनी व्यक्त केली.
चौकट
बीडमध्ये शतप्रतिशत भाजप व कमळ -डॉ.सारिकाताई क्षीरसागर
जुन्या पक्षात आमचे खच्चीकरण झाले. त्यामुळे आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला. बीडची ब्लॅकमेलर गँग विरोधी पक्षात गेली असून, बीडची पिडा दूर झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने व पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली बीडमध्ये शतप्रतिशत भाजप निवडून येईल, असा विश्वास डॉ. सारिकाताई क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
चौकट
कार्यकर्त्याच्या घोषणेला दाद देत देवेंद्र फडणवीस यांचा ‘जय श्रीराम’चा नारा
बीड नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या सभेत भाजप कार्यकर्ते व समर्थकांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. संपूर्ण परिसर घोषणांनी दुमदुमून गेला होता. यावेळी एका कार्यकर्त्याने दिलेल्या घोषणेला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनीही भाषण सुरू असतानाच ‘जय श्रीराम’चा नारा दिला. सभास्थळी उपस्थितांनी या क्षणाला जोरदार दाद दिली.


