- मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्याकडून मुस्लिम महिला डॉक्टरचा हिजाब जबरदस्तीने काढल्याच्या प्रकारावर जावेद झकारिया यांचा तीव्र निषेध
प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख
अकोला — बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी पाटणा येथे आयोजित शासकीय कार्यक्रमादरम्यान मुस्लिम महिला डॉक्टरचा हिजाब स्वतःच्या हाताने जबरदस्तीने काढल्याची घटना समोर आली असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हा प्रकार १२८३ नवनियुक्त डॉक्टरांना नियुक्तीपत्रे वितरित करण्याच्या कार्यक्रमात घडला. मंचावर उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा उपस्थित असताना डॉक्टर नुसरत परवीन नियुक्तीपत्र स्वीकारण्यासाठी मंचावर आल्या. त्यावेळी मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी “तुम्ही डॉक्टर आहात, मग चेहरा का झाकला आहे?” असे म्हणत त्यांचा हिजाब जबरदस्तीने काढला. या घटनेमुळे काही काळ कार्यक्रमस्थळी स्तब्धता पसरली. या प्रकारावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश संघटक सचिव जावेद ज़करिया यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला असून, हा प्रकार महिलांच्या सन्मानावर आणि धार्मिक स्वातंत्र्यावर थेट आघात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सार्वजनिक मंचावर एखाद्या महिलेशी असे वागणे अनैतिक, असंवेदनशील आणि संविधानविरोधी असल्याचे सांगत त्यांनी मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीकडून अशा वर्तनाची अपेक्षा करता येत नाही, अशी टीका केली. हिजाब ही मुस्लिम महिलेची धार्मिक ओळख आणि आत्मसन्मानाशी निगडित बाब असून, भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे आणि प्रत्येक नागरिकाला आपल्या धर्माचे पालन व वेशभूषेची स्वातंत्र्य आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. या घटनेबद्दल मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी सार्वजनिकरित्या माफी मागावी, अशी जोरदार मागणी जावेद झकारिया यांनी केली आहे.


