हिजाब वादावरून अकोल्यात आंदोलन; मोहम्मद अली चौकात प्रतीकात्मक जोडे मारून निषेध
प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख
अकोला : बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी एका शासकीय कार्यक्रमात नियुक्तीपत्र देताना मुस्लिम महिला डॉक्टरचा हिजाब जबरदस्तीने काढल्याच्या कथित घटनेच्या निषेधार्थ अकोला शहरातील मोहम्मद अली चौकात जोरदार आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान निदर्शकांनी प्रतीकात्मक स्वरूपात जोडे मारून आपला रोष व्यक्त केला तसेच नीतीश कुमार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. महिला सन्मान, धार्मिक स्वातंत्र्य आणि संविधानाने दिलेल्या अधिकारांच्या समर्थनार्थ आंदोलनकर्त्यांनी आवाज बुलंद केला. हिजाब हा मुस्लिम महिलांची धार्मिक ओळख व आत्मसन्मानाचे प्रतीक असून, अशा प्रकारची घटना केवळ एका महिला डॉक्टरच्याच नव्हे तर संपूर्ण मुस्लिम समाजाच्या भावना दुखावणारी असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. या आंदोलनात इस्माइल भाई, असलम फत्ता, मुंशीजी, अय्यूब भाई (दूधवाले), रफीक सिद्दीकी, जावेद ज़करिया, शेख अझीज सिकंदर, जमील भाई, निजाम भाई (मूर्तिजापूर), जावेद खान, हाजी अशरफ गाझी, रफीक झकरिया, आसिफ मनोरवाला, सम्मीर भूरानी, अमीर भाकेई, फैजान चह्वाण, हारून भाई, इमरान चह्वाण, चंदू भाई, सिपतैन खान यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. आंदोलन शांततेत पार पडले असून प्रतीकात्मक निषेधाद्वारे घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आणि संबंधित जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते व कच्छी मशिदीचे अध्यक्ष जावेद झकरिया यांनी लोकशाही देशात कोणत्याही महिलेच्या धार्मिक पोशाखाशी छेडछाड करणे अस्वीकार्य असल्याचे सांगितले. सार्वजनिक मंचावर एका महिला डॉक्टरसोबत असे वर्तन करणे हे महिला सन्मान, धार्मिक स्वातंत्र्य आणि संविधानिक मूल्यांच्या विरोधात असल्याचे त्यांनी नमूद केले. आंदोलनकर्त्यांनी या प्रकरणावर बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी सार्वजनिकरित्या महिलांची व मुस्लिम समाजाची माफी मागावी, तसेच भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, अशी ठाम मागणी केली.


