शाळा आता मनमानी पद्धतीने ‘इंटरनॅशनल’, ‘ग्लोबल’ शब्द वापरू शकणार नाहीत
शासनाचा निर्णय; निर्णयाची अंमलबजावणी करा :- मनोज जाधव यांची मागणी
बीड (प्रतिनिधी) राज्य शिक्षण मंडळाच्या अखत्यारितील शाळांकडून आपल्या नावांमध्ये ‘ग्लोबल’, ‘इंटरनॅशनल’, ‘सीबीएसई’ अशा फॅन्सी शब्दांचा वापर करून पालक आणि विद्यार्थ्यांची दिशाभूल व फसवणूक केली जात असल्याचे उघड झाले आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत शिक्षण संचालनालयाने आता कठोर पाऊल उचलले आहेत. पालक-विद्यार्थ्यांची फसवणूक थांबवण्यासाठी अशा शब्दांचा वापर करणाऱ्या शाळांवर बंदी घालण्यात आली असून, त्यांना तात्काळ नावे बदलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याची जिल्ह्यात तात्काळ काटेकोरपणे अंमलबजावणी करून पालकांची दिशाभूल करणाऱ्या शाळांची नावे बदलण्यात यावीत अशी मागणी आज निवेदनाद्वारे शिवसंग्रामचे युवा नेते तथा आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.
राज्य शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या अनेक शाळांनी आपल्या नावांमध्ये ‘इंटरनॅशनल’, ‘ग्लोबल’, ‘सीबीएसई’ किंवा ‘इंग्लिश मीडियम’ यांसारख्या शब्दांचा गैरवापर सुरू केला आहे. या शब्दांमुळे संबंधित शाळा आंतरराष्ट्रीय किंवा केंद्रीय शिक्षण मंडळाशी (उदा. CBSE) संलग्न असल्याचा पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा गैरसमज होत आहे, ज्यामुळे त्यांची दिशाभूल होत आहे. अनेक शाळांकडे कोणतीही आंतरराष्ट्रीय संलग्नता नसतानाही ते असे शब्द वापरत असल्याचे सर्रास पाहावयास मिळत आहे. पालक, विद्यार्थी आणि समाजाची दिशाभूल किंवा फसवणूक करणारे गैर-कायदेशीर शब्द शाळांच्या नावांमध्ये वापरले जाऊ नयेत, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ‘सीबीएसई’ (CBSE) हे केंद्र सरकारने स्थापन केलेल्या परीक्षा मंडळाचे नाव आहे. राज्य मंडळाच्या शाळांनी हे नाव वापरणे कायदेशीरदृष्ट्या अनुचित आहे. तसेच, ‘इंटरनॅशनल’ किंवा ‘ग्लोबल’ शब्द वापरण्यासाठी परदेशातील शाखा किंवा अधिकृत आंतरराष्ट्रीय संलग्नता असणे बंधनकारक आहे. तेव्हा बीड जिल्ह्यातील चुकीच्या नावाने सुरू असलेल्या शाळांची नावे तत्काळ बदलण्याची मागणी मनोज जाधव यांनी केली आहे.
हा निर्णय महाराष्ट्र राज्यातील राज्य शिक्षण मंडळाच्या (State Board) अखत्यारितील सर्व शाळांना लागू झाला आहे. विशेषतः ज्या शाळांनी आपल्या नावांमध्ये ‘ग्लोबल’, ‘इंटरनॅशनल’, ‘सीबीएसई’ किंवा ‘इंग्लिश मीडियम’ यांसारख्या शब्दांचा गैरवापर केला आहे.
हा निर्णय संचालनालयाने घेतला असून, विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि शिक्षण निरीक्षक यांना याबाबत कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नावांमध्ये दिशाभूल करणारे शब्द आढळल्यास, संबंधित शाळा व्यवस्थापनांना तात्काळ नाव बदलण्यास सांगितले जाणार आहे. नव्याने मान्यता मागणाऱ्या किंवा दर्जावाढीसाठी प्रस्ताव सादर करणाऱ्या शाळांच्या नावांची काटेकोर तपासणी केली जाईल. पालकांवर प्रतिकूल परिणाम होईल अशी नावे आढळल्यास, ती बदलल्यानंतरच शिफारस केली जाईल


