मिल्लीया महाविद्यालयात दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न.
शिक्षण ही सतत चालणारी प्रक्रिया – संचालक डॉ. सुधाकर शेंडगे
बीड: येथील मिल्लीया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर व आजीवन शिक्षण व विस्तार विभागाच्या वतीने “विद्यार्थी समुपदेशन व व्यवसाय मार्गदर्शन प्लेसमेंट ” या विषयावर दिनांक १ व २ जानेवारी २०२६ रोजी कार्यशाळा घेण्यात आली.
दि. १ जानेवारी २०२६ रोजी कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. सुधाकर शेंडगे (संचालक ,आजीवन शिक्षण व विस्तार विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर) यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद इलयास फाजिल, उपप्राचार्य प्रोफेसर हुसैनी एस एस, आजीवन शिक्षण व विस्तार विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रोफेसर पठाण अय्युब माजिदखान, हिंदी विभाग प्रमुख प्रोफेसर मिर्झा असद बेग यांची उपस्थिती होती. प्रमुख अतिथी संचालक डॉ. सुधाकर शेंडगे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात आजीवन शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षण ही सतत चालणारी प्रक्रिया असून विद्यार्थ्यांबरोबरच समाजातील प्रत्येक घटकासाठी कौशल्यविकास व ज्ञानवृद्धी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विस्तार कार्यक्रमांमुळे महाविद्यालय आणि समाज यांच्यातील दरी कमी होते, असेही त्यांनी नमूद केले. त्यांनी जीवनकौशल्यांच्या महत्त्वावर प्रकाश टाकत, विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास, व्यक्तिमत्व विकास आणि रोजगार क्षमतेसाठी अशा कार्यशाळांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद इलयास फाजिल यानी महाविद्यालयाच्या आजीवन शिक्षण आणि विस्तार उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी अशा शैक्षणिक आणि प्रशिक्षण उपक्रमांचा सुवर्णसंधी म्हणून लाभ घ्यावा, सतत स्वतःमध्ये सुधारणा करीत यशस्वी होण्यासाठी परिश्रम घ्यावे असे सांगितले. कार्यशाळेत मान्यवर वक्त्यांनी विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. डॉ. शेख रफीक (सदस्य, अभ्यास मंडळ – वनस्पतिशास्त्र ) यांनी व्यक्तिमत्व विकास या विषयावर प्रबोधनात्मक व्याख्यान दिले. त्यांनी आत्मजागरूकता, उद्दिष्ट निर्धारण व सकारात्मक दृष्टिकोन यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले.
दि. २ जानेवारी २०२६ रोजी प्रोफेसर अब्दुल अनीस अब्दुल रशीद ( इंग्रजी विभाग प्रमुख) यांनी संवाद कौशल्ये या विषयावर मार्गदर्शन करताना परस्परसंवाद, आत्मविश्वास व स्पष्ट अभिव्यक्ती यांच्या प्रभावी वापरावर भर दिला.
तसेच प्रा. इनामदार इलियास (महिला अध्यापक माहविद्यालय, बीड) यांनी स्पर्धापरीक्षा या विषयावर उपयुक्त टिप्स देत तयारीची कार्यपद्धती, वेळेचे व्यवस्थापन आणि मानसिक तयारीचे महत्त्व स्पष्ट केले.
अंतिम समारोप सत्रा मध्ये प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ. शेख एजाज अझीझ (महिला अध्यापक महाविद्यालय बीड) यानी बहुमोल मार्गदर्शन केले व अध्यक्षीय भाषण महाविद्यालयाचे प्राचार्य मोहम्मद इलयास फाजिल यानी केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी प्रोफेसर पठाण अय्युब माजिदखान यानी तर आभार उपप्राचार्य प्रोफेसर हुसैनी एस एस व डॉ. मोहम्मद आसिफ इक्बाल यांनी व्यक्त केले.मिल्लीया करिअर संसद व अहमद बिन अबूद करिअर एज्युकेशन सेल यांच्या सदस्यांनी या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी महत्वपूर्ण योगदान दिले. विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत वक्त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, कर्मचारी वृंद यांची उपस्थिती होती.


