खामगाव : विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगावद्वारे संचालित गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगाव येथील महिला सक्षमीकरण व उद्योजकता विकास समिती आणि गृह अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शिवणकला व फॅशन डिझायनिंग कोर्सचा शुभारंभ करण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने आयोजित या कोर्सचे उद्घाटन प्रभारी प्राचार्य डॉ. गीताली पुंडकर (कला महाविद्यालय, मलकापूर, अकोला) यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. उद्घाटनप्रसंगी डॉ. गीताली पुंडकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, शिवणकला ही केवळ एक कला नसून ती आत्मनिर्भरतेचा दृढ पाया आहे. अशा प्रकारचे प्रशिक्षण वर्ग विद्यार्थीनी व महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळवून देण्यासोबतच आधुनिक फॅशन क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणारे ठरतात. कौशल्याधारित शिक्षणामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो आणि त्या स्वतःचा व्यवसाय उभारण्यास सक्षम बनतात, असेही त्यांनी नमूद केले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित मा. सौ. श्रद्धाताई प्रशांत बोबडे (संचालिका, विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगाव) यांनी या क्लासच्या माध्यमातून अनेक महिलांना व विद्यार्थीनींना रोजगाराभिमुख शिक्षण मिळेल, तसेच स्थानिक पातळीवर फॅशन क्षेत्राचा नवा पाया तयार होईल, असा विश्वास व्यक्त केला. महिलांच्या सक्षमीकरणासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अशोक पडघन होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, या कोर्ससाठी महाविद्यालय सातत्याने प्रयत्नशील राहील. स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी विद्यार्थी, विद्यार्थीनी व महिलांना व्यावहारिक अनुभव देऊन स्वतःचा व्यवसाय उभारण्यास महाविद्यालया मार्फत सर्वतोपरी मदत केली जाईल. यावेळी शिवणकला व फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षक अरविंद लांडे यांनी अभ्यासक्रमातील महत्त्वपूर्ण घटकांची सविस्तर माहिती दिली. यामध्ये बेसिक व अॅडव्हान्स शिवणकला, फॅशन डिझायनिंग, कटिंग, पॅटर्न मेकिंग, मशीन शिवण कौशल्य यांचा समावेश असून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्ष कामासाठी सक्षम केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या कोर्सचे प्रशिक्षण गृह अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. नीता बोचे यांच्या मार्गदर्शनाखाली दिले जाणार आहे. उद्घाटन कार्यक्रमाला डॉ. डी. एन. व्यास, प्रा. संगीता वायचाळ, अरविंद लांडे, डॉ. रेश्मा मारवाडी यांच्यासह मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थी महिला व विद्यार्थीनी उपस्थित होत्या.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी धनराज अहिर, अंजली करांगळे, शारदा इंगळे, पूजा बोचरे, ऋतुजा वानखडे, सौ. स्वाती खोडके यांनी अथक परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात आणि महिलांच्या सक्षमीकरणाच्या संदेशासह पार पडला.